बारामती, दि. 20: बारामतीजवळील वंजारवाडी परिसरात वनक्षेत्रात दारू पिताना दोन अनोळखी गटांमध्ये वाद चिघळून गंभीर हाणामारी झाली. दगड, हात व बुक्क्यांनी झालेल्या या मारहाणीत गणेश लोणकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या छाती, पाठी आणि खांद्यावर धारदार शस्त्राने कापल्यासारख्या जखमा झाल्या आहेत. (Baramati Crime)

घटनास्थळी दोन्ही गट काही अंतरावर बसून मद्यपान करत असताना बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हल्ल्यात झाले. या प्रकारानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अनोळखी व्यक्तींवर तक्रारी दाखल केल्या आहेत.
संतोष पोपट जाधव यांच्या तक्रारीवरून सुशील कुमार मिश्रा, भूपेंद्र सिंग आणि लोकेश दरपे यांच्याविरोधात खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे, लोकेश दरपे यांनी दिलेल्या फिर्यादीत गणेश लोणकर (रा. कसबा), संतोष जाधव आणि साहिल साळवे (रा. अमराई, बारामती) हे आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहेत. त्यांच्या विरोधात इच्छापूर्वक दुखापत केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेऊन बारामती तालुका पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या प्रकरणाची विशेष दखल घेत तपास वेगाने सुरू केला. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तांत्रिक पुरावे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विक्रम पवार हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे अमोल पवार यांनी केली आहे.







