देहू: देहूजवळील भंडारा डोंगरावर एकटी सोडून दिलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या प्रकरणाने काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. मात्र, या घटनेनंतर समोर आलेली एक बाब मनाला समाधान देणारी आहे. या बाळाचा सांभाळ करण्यासाठी अनेक कुटुंबे आणि संस्थांनी पुढाकार घेतला असून, तिच्यासाठी शेकडो हात मदतीला पुढे आले आहेत.

चिमुकलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर प्रकाश कोयाडे यांनी तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या माध्यमातून तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉक्टरांची ही पोस्ट तब्बल 55 लाख लोकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर अवघ्या दीड दिवसात 300 ते 400 कुटुंबांनी डॉक्टरांशी संपर्क साधत हे बाळ दत्तक घेण्याची तयारी दर्शवली.

अनेकांनी फोन आणि मेसेज करून मुलीची जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रतिसादामुळे डॉक्टरांसह तिच्यावर उपचार करणाऱ्या टीमलाही मोठा भावनिक आधार मिळाला. समाजात अजूनही माणुसकी आणि संवेदनशीलता जिवंत असल्याचे या घटनेतून दिसून आले.

आता मुलीच्या पुढील आयुष्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तिच्या आई-वडिलांची चौकशी, वैद्यकीय तपासणी आणि DNA चाचणी यासह आवश्यक प्रक्रिया केली जात आहे. बाळाला थेट कोणत्याही कुटुंबाकडे दत्तक देता येत नाही. त्यासाठी कायदेशीर आणि संस्थात्मक नियमांचे पालन करावे लागते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिच्या भविष्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाणार आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून या चिमुकलीपर्यंत मदत पोहोचवण्यात आली आणि तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक जण पुढे आले, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.






