अहिल्यानगर : सायकलवरून आनंदाने निघालेल्या दोन चिमुकल्यांचा प्रवास एका भीषण अपघातात संपला. कर्जत तालुक्यातील निंबोडी फाटा येथे भरधाव इर्टिगा कारने सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात चैतन्य छगन उदमले (वय ८) आणि ओंकार बापू उदमले (वय १०) या दोन बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे निंबोडी, शितपूरसह संपूर्ण कर्जत तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य आणि ओंकार हे दोघे शनिवारी दुपारी सायकलवरून शितपूर फाट्याकडून निंबोडी फाट्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी श्रीगोंद्याकडून जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इर्टिगा कारने (एमएच ०४ जेबी २२०४) दशरथ बापू फुले यांच्या घरासमोर त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तर सायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात दोन्ही बालके गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बालकांना वाचवता आले नाही.

अपघातानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर आणि मिरजगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी घटनास्थळी भेट दिली. भाजप नेते अशोक खेडकर यांनीही घटनास्थळी जाऊन संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधला.

या प्रकरणी चैतन्यचे वडील छगन मारुती उदमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक संदीप दामोदर गोरे (रा. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत.
खेळण्या-बागडण्याच्या वयात दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उदमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने निंबोडी आणि शितपूर परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत असून संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.






