पुणे, ता. 31: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई केल्याचा राग मनात धरून तीन सराइतांनी वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला मारहाण केल्याची गंभीर घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा चौकात घडली आहे. या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. (Sinhagad Road Traffic)

लकी गौरव आनंद (वय 21), साहिल प्रकाश चिकणे आणि श्रावण रमेश हिरवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार राजेंद्र सेंगर यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार सेंगर हे सिंहगड रस्ता वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी (ता. 30) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धायरी फाटा चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना आरोपी तिघे एकाच दुचाकीवरून (ट्रिपल सीट) प्रवास करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने सेंगर यांनी दुचाकी थांबवून चालकावर दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईचा राग आल्याने आरोपींनी पोलिस हवालदार सेंगर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर अचानक मारहाणीत झाले. आरोपी श्रावण हिरवे याने सेंगर यांना चापट मारली, तर इतर आरोपींनी आरडाओरडा करत त्यांचा गणवेश फाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे काही काळ धायरी फाटा चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालुसरे करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.






