पुणे: कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी परिसरात पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला होता. याच ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती असहाय्य अवस्थेत पडल्याचे पोलिसांना आढळले. त्यांना स्वतःचे नाव, घराचा पत्ता किंवा कुटुंबीयांची माहिती सांगता येत नव्हती. स्मृतीभ्रंशामुळे ते कोणतीही स्पष्ट माहिती देऊ शकत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.

कान्हा हॉटेल परिसरातील या घटनेची माहिती मिळताच बीट मार्शलवरील पोलीस अंमलदार अमोल हंबीर आणि आकाश आगवणे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वृद्धाला आधार देत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला आजोबांकडून कोणतीही उपयोगी माहिती मिळाली नाही.

पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर वृद्धांच्या तोंडून अचानक ‘अप्पर’ हा शब्द बाहेर पडला. हाच एकमेव धागा पकडून पोलिसांनी पुढील शोध सुरू केला. विशेष म्हणजे, अमोल हंबीर यांनी यापूर्वी अप्पर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काम केले होते. त्यामुळे त्यांना परिसराची चांगली माहिती होती.

पोलिसांनी वेळ न दवडता वृद्धाला रिक्षातून अप्पर इंदिरानगर परिसरात नेले. त्यानंतर वेगवेगळ्या रस्त्यांवरून आणि गल्लीबोळातून रिक्षा फिरवत आजोबांना घर ओळखता येते का, याचा अंदाज घेतला जात होता.
सुमारे 45 मिनिटांच्या शोधानंतर एका ठिकाणी आजोबांनी अचानक हाताने एका दिशेकडे इशारा केला. पोलिसांनी त्या दिशेने जाऊन स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. त्यातून अखेर वृद्धाचा राहता पत्ता समोर आला. यानंतर पोलिसांनी आजोबांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सोपवले.







