पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना लोणावळा पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा निर्णय दिला आहे.

न्यायालयात नेमका काय युक्तिवाद झाला?

सरकारी वकिलांनी न्यायालयात आरोपींची अधिक चौकशी करण्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की, सिया गोयलचा आणखी एक दुसरा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यातील डिलीट केलेला डेटा पोलिसांनी यशस्वीरित्या रिकव्हर केला आहे. या मोबाईल चॅट्समध्ये अनेक सांकेतिक शब्द आणि निक नेम्सचा वापर करण्यात आला आहे. या गूढ भाषेचा उलगडा करण्यासाठी आणि दोघांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
दुसरीकडे, आरोपींचे वकील विपुल दुशिंग यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. सिया पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत असून मोबाईल आधीच जप्त करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. केवळ सांकेतिक शब्दांच्या पडताळणीच्या नावाखाली पुन्हा पोलीस कोठडी मागणे कायद्यानुसार योग्य नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. चेतनच्या वकिलांनीही केवळ शक्यतेच्या आधारावर कोठडी वाढवून देता येणार नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले.
आज कोर्टात सुनावणी दरम्यान नार्को टेस्टचाही विषय समोर आला. त्यावर न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, आरोपींच्या संमतीशिवाय नार्को टेस्ट करता येणार नाही. त्यावर सरकारी वकिलांनी सध्या अशा चाचणीची गरज नसल्याचे सांगितले. अखेर, पोलिसांकडे कोणताही ठोस नवीन मुद्दा नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपींची रवानगी थेट न्यायालयीन कोठडीत केली आहे.
या नव्या मोबाईलच्या शोधामुळे आगामी काळात तपासाला कोणती दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





