बारामती : स्वतःला पोलीस असल्याचे भासवून भामट्यांनी ८५ वर्षीय माजी सैनिकाकडील सुमारे दोन लाख पाच हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे. बारामती-पाटस रस्त्यावरील मेदड गावाजवळील कॅनॉल पुलावर १४ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा बारामती शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

पेडगाव येथील रहिवासी असलेले ८५ वर्षीय माजी सैनिक साहेबराव रामभाऊ खेडकर हे जुन्या अंगठ्या बदलून दोन नवीन अंगठ्या बनवण्यासाठी बारामतीतील चंदूकाका सराफ येथे गेले होते. तेथून नातेवाईकासोबत दुचाकीवरून परतत असताना मेदड गावाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले.
या दोघांनी आपण पोलीस असल्याचे सांगितले. बारामतीत चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे कारण देत त्यांनी तपासणीच्या नावाखाली खेडकर यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर त्या रुमालात गुंडाळून पुन्हा त्यांच्या हातात दिल्या.

काही वेळाने संशय आल्याने खेडकर यांनी रुमाल उघडून पाहिला. त्यावेळी त्यातील सुमारे १२.५९० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अंगठ्यांची किंमत दोन लाख पाच हजार १३५ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर घाबरलेल्या खेडकर यांनी सुरुवातीला कोणालाही याबाबत सांगितले नाही. मात्र, नंतर मुलगी आणि नातवंडांच्या मदतीने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलीस माहितीनुसार, एका संशयिताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून, त्याची उंची जास्त, शरीरयष्टी मजबूत आणि रंग गोरा आहे. तर दुसरा संशयित सावळ्या रंगाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. बारामती शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





