इंदापूर : लग्नसोहळ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या बॅगेतून चोरट्याने सुमारे एक लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना इंदापूर शहरातील लकी मंगल कार्यालयात घडली. गुरुवारी (ता. 19) सायंकाळी सात ते रात्री साडेआठच्या दरम्यान ही चोरी झाली. या घटनेमुळे लग्नसमारंभातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जुल्फीकार शेख बागवान (वय 26, रा. पटेल चौक, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) हे कुटुंबीयांसह इंदापूर येथील लकी मंगल कार्यालयात नातेवाइकांच्या लग्नासाठी आले होते. त्यांनी आपली बॅग मंगल कार्यालयातील वधू पक्षाच्या खोलीत ठेवली होती. या बॅगेमध्ये सोन्याचा राणीहार आणि दोन सोन्याच्या अंगठ्या ठेवण्यात आल्या होत्या.
गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास जुल्फीकार बागवान हे दागिने घालण्यासाठी वधू पक्षाच्या खोलीत गेले. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता, त्यातील सोन्याचा राणीहार आणि दोन अंगठ्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेतला, मात्र दागिने मिळून आले नाहीत.

दरम्यान, अज्ञात चोरट्याने गर्दीचा आणि लग्नसोहळ्यातील गडबडीचा फायदा घेत बॅगेतील दागिने चोरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जुल्फीकार बागवान यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सुमारे एक लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे नमूद केले आहे.






