उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन हद्दीतील तुपे वस्ती परिसरात असलेला डिव्हायडर सध्या वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील अवघ्या दीड महिन्यापासून या परिसरात सातत्याने भीषण अपघात घडत असून, अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वाढती जीवितहानी रोखण्यासाठी तुपे वस्ती परिसरातील हा धोकादायक डिव्हायडर तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करून त्याची जागा बदलावी, अशी मागणी उरुळी कांचन ग्रामपंचायत आणि उरुळी कांचन पोलीस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोलापूर रोडवरील तुपे वस्ती परिसरातील डिव्हायडरची रचना आणि स्थान अत्यंत धोकादायक ठरत आहे. महामार्गावरून सुसाट वेगाने येणारी वाहने आणि डिव्हायडरमधून रस्ता ओलांडणारे स्थानिक नागरिक यांच्यात समोरासमोर धडका होऊन गंभीर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दीड महिन्यांत या परिसरात वाढत्या अपघातांची मालिकाच सुरू झाली असून, अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हे पाउल उचलले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायत आणि उरुळी कांचन पोलिसांनी एकत्र येत MSRDC प्रशासनाला निवेदन दिले आहे. सदर डिव्हायडर तातडीने बंद करून तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित ठिकाणी त्याची जागा बदलण्यात यावी, जेणेकरून महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील आणि अपघातांना कायमचा आळा बसेल, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस उपनिरीक्षक तायडे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने अजिंक्य महादेव कांचन आणि प्रसन्न भोर उपस्थित राहून प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य कांचन म्हणाले, “मागील दीड महिन्यांपासून मोठी वाहतूक कोंडी होत असून वारंवार अपघात होत आहेत. या अपघातात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहेत. यामुळे या ठिकाणावरचा डिव्हायडर कायमस्वरूपी बंद करून पुढे काढावा यासाठी पोलिसांकडून पत्र देण्यात आले आहे. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून या अगोदरही निवेदन देण्यात आले असून परत MSRDC ला पत्र देण्यात येणार आहे






