लोणी काळभोर, ता. २१ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी फाटा येथे भरधाव ट्रकच्या धडकेत ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) फाट्यावर १९ जुलै रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रस्ता ओलांडताना ट्रकचालकाने वेग कमी न करता बेदरकारपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप जखमी वृद्धाने केला असून, याप्रकरणी चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किसन रंगनाथ खैरे (वय ७२, रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर फतरू ऐहमद इनामदार (वय ४८, रा. बोळेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन खैरे हे १९ जुलै रोजी सकाळी सुमारे ८ वाजता दाढी करण्यासाठी घरातून पायी लोणी गावाच्या दिशेने निघाले होते. लोणी फाटा येथे रस्ता ओलांडत असताना पुणे–सोलापूर महामार्गावरून भरधाव येणाऱ्या ट्रकला त्यांनी हातवारे करून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वेग कमी न करता ट्रक पुढे दामटल्याने खैरे यांना जोरदार धडक बसली.
धडकेमुळे खैरे रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना रस्त्याच्या बाजूला हलवले. तसेच ट्रकचालकाला थांबवून वाहनासह लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नेले. घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा योगेश खैरे घटनास्थळी पोहोचला आणि जखमी वडिलांना उपचारासाठी कदमवाकवस्ती येथील मॅक्सकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
वैद्यकीय तपासणीत उजव्या पायाच्या घोट्याजवळ फ्रॅक्चर झाले असून पायाच्या बोटाचे कातडे सोलटल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असताना किसन खैरे यांनी ट्रकचालकाविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी एमएच-१२-झेडई-०९४७ क्रमांकाच्या ट्रकचा चालक फतरू ऐहमद इनामदार याच्याविरुद्ध बेदरकार व निष्काळजीपणे वाहन चालवून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







