न्हावरे: राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू असतानाच शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे तब्बल ३५० किलो खवा रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, छाप्यांच्या धास्तीनेच हा खवा टाकून देण्यात आला असावा,अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

शिरसगाव काटा येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत असलेल्या शेतकरी विजय वामन काटे यांच्या गट क्रमांक ६ मधील शेताशेजारील कॅनॉल रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी खव्याच्या १४ बॅगा टाकून दिल्या.प्रत्येक बॅगेचे वजन सुमारे २५ किलो असल्याने एकूण खव्याचे वजन अंदाजे ३०० ते ३५० किलो इतके असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी सकाळी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने विजय काटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्यालगत खव्याच्या बॅगांचा मोठा ढीग पडलेला दिसून आला.खव्याची झालेली नासाडी, त्यातून येणारा उग्र वास आणि त्याची स्थिती पाहता हा माल दोन ते तीन दिवसांपूर्वी येथे फेकण्यात आला असावा,असा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
राज्यात सध्या अन्न भेसळविरोधी मोहिमेला वेग आला असून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी छापेमारी व तपास मोहीम सुरू आहे. भेसळयुक्त खवा,दूध व दुग्धजन्य पदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात खवा निर्जनस्थळी फेकून दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संबंधित खवा निकृष्ट दर्जाचा होता का,तो भेसळयुक्त होता का,अथवा कारवाईच्या भीतीने पुरावे नष्ट करण्यासाठी तो टाकून देण्यात आला का,याबाबत परिसरात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र,हा खवा नेमका कुठून आणण्यात आला आणि तो येथे कोणी टाकला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अन्न भेसळीसारख्या गंभीर प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाचा तपास करून सत्य बाहेर आणावे,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खव्याच्या बॅगांमुळे परिसरात दुर्गंधी
शिरसगाव काटा परिसरातील कॅनॉल रस्त्यालगत टाकून दिलेल्या खव्याच्या बॅगांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. दुर्गंधीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला.खवा कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची विल्हेवाट लवकर लावण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.







