शिरूर, ता. १९ : घोडनदीच्या पात्रातील पाणी शेतीसाठी साचून राहावे म्हणून शेतकऱ्यांनी बांधलेल्या मातीच्या तात्पुरत्या बांधाऱ्याची तोडफोड केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तिघांनी मिळून दोन शेतकरी भावांवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना निमोणे (ता. शिरूर) येथे गुरुवारी (ता. १८) दुपारी चारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दत्तात्रय नानासो काळे (वय २९, व्यवसाय शेती, रा. निमोणे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत ज्ञानदेव काळे, शुभम ज्ञानदेव काळे आणि समीर प्रकाश शेलार (सर्व रा. निमोणे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय काळे आणि त्यांचा भाऊ अक्षय काळे हे गुरुवारी (दि. १८) दुपारी चारच्या सुमारास शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी घोडनदीच्या पात्रात शेतकऱ्यांनी पाणी साठविण्यासाठी तयार केलेला मातीचा बांध आरोपींनी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत जाब विचारताच आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर संकेत काळे आणि शुभम काळे यांनी मोटारसायकलला लावलेले लोखंडी रॉड काढून दत्तात्रय काळे यांच्या डोक्यावर, तोंडावर, छातीवर आणि पाठीवर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या अक्षय काळे यांनाही लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. समीर शेलार याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत, “आम्ही जेलमध्ये राहून आलो आहोत, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही,” अशी धमकी देत गावात आरडाओरडा केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी आलेल्या सार्थक बाळू जगदाळे यांनी जखमींना मदत करून शिरूर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर दोघांवर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.






