राहुलकुमार अवचट

Pune : ग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेवून त्या प्राधान्याने सोडाव्यात, ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन होणार नाही यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने कार्यवाही करावी तसेच जिल्ह्यात १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्राहकांचे हक्क व कर्तव्याविषयी जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय तसेच अशासकीय सदस्य, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परिषदेचे सचिव महेश सुधाळकर, परिवहन अधिकारी, पोलीस, महावितरण आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की सदस्यांनी ग्राहकांच्या सेवांबाबत मांडलेल्या सूचना विचारात घेता सकारात्क विचार करुन कार्यवाही करण्यात येईल. या सूचनांचा बैठकीच्या इतिवृत्तात समावेश करुन सर्व संबंधित विभाग तसेच सदस्यांना इतिवृत्त उपलब्ध करुन द्यावे. या इतिवृत्तानुसार संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही करुन आगामी बैठकीपूर्वी अनुपालन अहवाल सादर करावा. अनुपालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असेही डुडी म्हणाले.
यावेळी परिषदेच्या सदस्यांनी ग्राहकांच्या सेवांबाबत सूचना केल्या.







