अमित मुंडिक

पुणे : चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 20 वर्षीय तरुणीचा ऑनलाईन छळ (Cyber Harassment) केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी सुदर्शन सुनील जाधव (वय 25, रा. चाकण) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI)चा गैरवापर करून पीडित महिलेची बदनामी आणि अश्लील मेसेज पाठवण्याचा गंभीर गुन्हा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुदर्शन जाधव याने सोबत काम करणाऱ्या कंपनीतील महिलेशी संबंधित वैयक्तिक माहिती आणि फोटो चोरले. त्यानंतर त्याने ‘Leonardo . AI’ या अॅपच्या मदतीने महिलेचे बनावट फोटो तयार केले त्यानंतर फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून महिलेला अश्लील मेसेज पाठवत तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली.
या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा आयपी (IP) ॲड्रेस आणि मोबाईल क्रमांक शोधून काढला. आणि त्या आधारावर आरोपी सुदर्शन जाधव याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यासाठी वापरलेला मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सायबर तंत्रज्ञानाचा गैरवापर करून छळ केल्याचे हे प्रकरण गंभीर मानले जात असून, याप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.






