पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महविद्यालयीन विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ताथवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात आत्महत्येमागील कारणही समोर आलं आहे. सहिती कलुगोटाला रेड्डी (वय 20, रा. अक्षरा इलेमेंटा सोसायटी, ताथवडे) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थींनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्गमित्राकडून सतत होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. सहिती आकुर्डीतील एका महाविद्यालयाच इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय 54) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव राजेंद्र डोंगरे (वय 20, रा. मयूर समृद्धी, आकुर्डी गावठाण) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मोबाईलमध्ये व्हॉइस मेसेज..
सहितीच्या आत्महत्येमागील कारण समजू न शकल्याने सुरूवातीला पोलिसांकडून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तिने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉइस मेसेज करून ठेवले होते. तसेच काही रेकॉर्डिंग व पुरावे मित्रांना पाठवत स्वतःचा मोबाईल कुठे ठेवला आहे त्याचे ठिकाण, त्याचा पासवर्डही सांगितला होता. तिच्या मित्र-मैत्रिणींनी या सर्व प्रकाराची माहिती तिच्या पालकांना दिली.

पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर आत्महत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी डोंगरे याच्यावर सहिती हीस शारीरिक, मानसिक त्रास देण्याबरोबर वारंवार शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.







