पुणे: वानवडी परिसरात (Pune Crime) पैशावर कोंबड्यांची झुंज लावून (Pune News) जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 5,11,880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये सहा कोंबड्या, तीन मोटारसायकली, पाच मोबाईल हँडसेट आणि रोकड 2,580 रुपये यांचा समावेश आहे. ही कारवाई शनिवारी रात्री वानवडी पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांच्या सूचनेनुसार शहरातील अवैध धंदे आणि जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर वानवडी पोलिस ठाण्याचे तपास पथक 19 ऑक्टोबर रोजी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार गोपाळ मदने आणि अमोल पिलाणे यांना गुप्त माहिती मिळाली. “इम्प्रेस गार्डनच्या पाठीमागे, बंगला क्रमांक 2 जवळ, मोकळ्या जागेत काही इसम पैशावर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत आहेत,” अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून तिथे छापा टाकला.
या छाप्यात अमोल सदाशिव खुर्द (रा. रविवार पेठ), मंगेश आप्पा चव्हाण (रा. भवानी पेठ), निखिल मनिष त्रिभुवन (रा. घोरपडी), अमिर आयुब खान (रा. घोरपडीगाव), सचिन सदाशिव कांबळे (रा. भवानी पेठ) आणि प्रणेश गणेश पॅरम (रा. कॅम्प) या सहा आरोपींना पकडण्यात आले. हे सर्वजण पैशावर कोंबड्यांची झुंज लावून हार-जीतचा खेळ खेळत होते, असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या ठिकाणावरून सहा रंगीबेरंगी कोंबडे, झुंजीसाठी वापरलेल्या तंगुसच्या पिशव्या, तीन दुचाकी, पाच मोबाईल हँडसेट आणि रोकड 2,580 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण 5,11,880 रुपयांचा माल पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(ब) तसेच प्राण्यांना क्रूरपणे वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार कलम 11(इ)(न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने केली. या पथकात अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, अर्षद सय्यद आणि सुजाता फुलसुंदर यांचा समावेश होता.







