पुणे: कमी वेळेत मोठी कमाई करण्याच्या नादात गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारलेल्या एका सराईत दुचाकी चोराचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने कारवाई करत सचिन पांडुरंग मरळे या आरोपीला अटक केली आहे.

२५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले
पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील तब्बल २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात आला. अहोरात्र सुरू असलेल्या तपासानंतर पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सचिन मरळे याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात त्याने पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल २२ महागड्या दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १२ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इलेक्ट्रिशियनच्या कौशल्याचा चोरीसाठी वापर
आरोपीने इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच कौशल्याचा वापर करून तो दुचाकी चोरी करत असल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले.
चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करताना आरोपी ‘या गाड्या लिलावातून घेतल्या आहेत’, असा खोटा बनाव करत असे. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे या दुचाकी ग्राहकांना विकल्या जात असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या व्यक्तींविरोधातही पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







