पुणे: राज्यभर खळबळ उडवणाऱ्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी (Vaishnavi Hagavane Case) प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड झाली आहे. सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून 23 फेब्रुवारीपासून खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता न्यायालयीन प्रक्रियेत निर्णायक टप्पा गाठण्याची चिन्हे दिसत आहेत. (Pune Crime)

या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलीस यांनी 14 जुलै रोजी एकूण 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. वैष्णवीच्या मृत्यूनंतर 58 दिवसांनी हे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. तपासादरम्यान वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. आता सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध औपचारिक आरोप निश्चित केले आहेत.
वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह 16 मे रोजी भुकूम येथील सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त झाला; मात्र शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. आत्महत्या की घातपात, याबाबत संशय निर्माण झाला आणि राज्यभर संतापाची लाट उसळली. हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने तपास प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित झाले होते.
निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवून धमकावल्याचा अतिरिक्त आरोप ठेवण्यात आला आहे. सर्व आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ व मारहाण, गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप आहेत.
आता न्यायालयाने आरोप निश्चित केल्याने साक्षीदारांची साक्ष आणि पुराव्यांची मांडणी याला सुरुवात होणार आहे. या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले असून निकाल काय लागतो, यावर पुढील कायदेशीर आणि सामाजिक चर्चेची दिशा ठरणार आहे.







