पुणे : कर्नाटकातील सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या पुण्यातील मांडरे कुटुंबावर काळाने घाला घातला. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मांडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ओंकार चंद्रशेखर मांडरे (२६), रेश्मा मांडरे (३२) आणि देवांश मांडरे (४) अशी मृतांची नावे आहेत. पुण्यातील मांडरे कुटुंब कारने सौंदत्तीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी यरगट्टीहून गोकाकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत ओंकार, रेश्मा आणि चार वर्षांचा देवांश यांचा जागीच मृत्यू झाला. देवीच्या दर्शनासाठी आनंदाने निघालेल्या कुटुंबावर या अपघातामुळे अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.

या अपघातात श्रीकांत मांडरे, वंदना मांडरे आणि हर्षदा मांडरे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.






