पुणे : पोलीस भरतीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांची झालेली मैत्री पुढे प्रेमात बदलली. दोघींनीही पोलीस शिपाई म्हणून भरती झाल्यानंतर योगायोगाने त्यांना एकाच ठिकाणी नियुक्ती मिळाली. त्यानंतर त्या एकाच ठिकाणी राहू लागल्या आणि त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. गेल्या तीन वर्षांपासून त्या समलैंगिक नात्यात असल्याचे सांगितले जाते. या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेत दोघींनी विवाह करण्याचे ठरवले होते. मात्र, आता त्यांनी विवाहाचा निर्णय लांबणीवर टाकल्याची माहिती समोर आली आहे.

दोघींनी 30 ऑगस्ट रोजी विवाह करण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी लग्नपत्रिका छापण्यात आल्या होत्या. तसेच विवाहासाठी रजेचा अर्जही करण्यात आला होता. आळंदी येथे हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा होती. मात्र, या विवाहाला दोघींच्या कुटुंबीयांकडून तीव्र विरोध करण्यात आला.

विवाहाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच त्यांनी पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या विवाहाबाबत चिंता व्यक्त केली आणि तो थांबवण्याची मागणी केली. मात्र, दोन्ही महिला प्रौढ असून हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित परस्पर संमतीचा निर्णय असल्याने पोलीस त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, दोन महिला पोलीस कर्मचारी विवाह करणार असल्याची चर्चा पुणे पोलीस दलात आणि शहरात सुरू झाली. त्यानंतर सोशल मीडियावरही याबाबत विविध पोस्ट प्रसारित झाल्या. माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली.
या वाढत्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही महिला पोलिसांनी विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबीयांचा विरोध आणि या प्रकरणाची सार्वजनिक पातळीवर झालेली चर्चा यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, दोन्ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित हा विषय असल्याने त्यांच्या वैयक्तिक निर्णयाचा आणि गोपनीयतेचा आदर करण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या त्यांचा विवाह होणार की पुढे रद्द केला जाणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.







