दौंड, ता. 25 : बकऱ्या चारण्याच्या जुन्या वादातून दूध घालण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या शेतकऱ्याला रस्त्यात अडवून तब्बल 14 जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना लोणारवाडी (ता. दौंड) येथे घडली. मारहाणीत खाली पडल्यानंतरही हल्लेखोरांनी मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर मदतीला आलेल्या ग्रामस्थांसमोरच एका व्यक्तीने कोयत्याने शेतकऱ्याच्या डोक्यात वार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या हल्ल्यात राजेंद्र पोपट महाडीक (वय 46, व्यवसाय शेती, रा. लोणारवाडी, ता. दौंड) हे जखमी झाले असून त्यांच्यावर दौंड येथील कोल्हे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात नामदेव कामजी महानवर, चांगदेव नामदेव महानवर, दत्तात्रय नामदेव महानवर, पांडुरंग ज्ञानबा महानवर, संतोष ज्ञानबा महानवर, महादेव गुलाब महानवर, खंड ज्ञानबा महानवर, दामु कामाजी महानवर, दादा बबन महानवर, प्रथमेश पांडुरंग महानवर, बबलु मल्हारी महानवर, आप्पा दामु महानवर, राहुल पांडुरंग महानवर आणि अनिकेत दादा महानवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र महाडीक हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 24ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून शिवशंकर दूध संकलन केंद्रावर दूध घालण्यासाठी जात होते. लोणारवाडीतील मोरया मेडिकलसमोर आले असता जुन्या वादातून संबंधितांनी त्यांना अडवले. आरोपींनी राजेंद्र महाडीक यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही आमच्याविरुद्ध एनसी का दाखल केली?’ असे म्हणत अचानक त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. मारहाणीत ते दुचाकीवरून खाली पडले, मात्र त्यानंतरही त्यांना मारहाण सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.

यावेळी गावातील वैभव पुणेकर, मंगेश वाघ आणि योगेश बरळ यांनी मध्यस्थी करून महाडीक यांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. या मारहाणीत जखमी झालेल्या महाडीक यांना वैभव पुणेकर यांच्या वाहनातून उपचारासाठी नेण्याची तयारी सुरू असतानाच चांगदेव नामदेव महानवर याने हातातील कोयत्याने महाडीक यांच्या डोक्यात वार केला आहे. कोयत्याच्या वारामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर वैभव पुणेकर यांनी महाडीक यांना तातडीने दौंड पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी यादी दिल्यानंतर त्यांना कोल्हे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
जुन्या वादातून हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल
बकऱ्या चारण्याच्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित 14 जणांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच चांगदेव महानवर याने कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राजेंद्र महाडीक यांनी केला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम भा. न्या. सं. कलम 118(1), 189(2),189(4),190, 191(2),191(3) ,3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करत आहेत.







