कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचा आणि गर्भपाताचा मोठा काळबाजार चालवणाऱ्या टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गर्भलिंग चाचणी करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची ही पहिलीच घटना आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या कठोर कारवाईच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

करवीर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील परिते (भोगावती कारखाना परिसर) येथील एका भाड्याच्या खोलीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वैद्यकीय पथकाने छापा मारला होता. तेथे छुप्या पद्धतीने सोनोग्राफी आणि गर्भलिंग चाचणी सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ही केवळ एक घटना नसून एक संघटित गुन्हेगारी नेटवर्क असल्याचे स्पष्ट झाले.

ही टोळी गर्भवती महिलांचा शोध घेणे, ग्राहकांशी संपर्क साधणे, बेकायदेशीर सोनोग्राफी करणे, तसेच औषधे पुरवून गर्भपाताची सोय करणे अशी कामे करत होती. 2020 ते 2026 या काळात या टोळीवर करवीर, जुना राजवाडा, राधानगरी आणि भुदरगड पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 11 गुन्हे दाखल झाले आहेत. आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे हा गुन्हा वारंवार केला जात होता.

कारवाईतील प्रमुख आरोपी
१. स्वप्निल केरबा पाटील (टोळीप्रमुख, बाळिंगा, करवीर)
२. महेश सुबराव पाटील (सिसे, राधानगरी)
३. श्रीमंत तानाजी पाटील (परिते, करवीर)
४. विजय लक्ष्मण कोळसकर (मडिलगे खुर्द, भुदरगड)
५. प्रशांत वसंत जाधव (सिव्हिल, कर्नाटक)
६. दत्तात्रय कृष्णात पाटील (सिसे, राधानगरी)
७. ओंकार गोरखनाथ कराळे (ससे, राधानगरी)
८. सुनील प्रकाश पाटील (सिसे, राधानगरी)
९. अनिल प्रकाश टिपुगडे (भोगावती, करवीर)
१०. शिवप्रसाद सत्याप्पा महादेव पाटील (इचलकरंजी)
११. अश्विनी गजानन शिंदे (कसबा वाळवे, राधानगरी)
पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक अनुज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या टीमने हा प्रस्ताव तयार केला. पोलिसांच्या या ऐतिहासिक पावलामुळे अवैध गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.







