पुणे : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ‘कॉक्रोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला पुण्यातही प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईनंतर पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण आंदोलनात सहभागी झाले.

यावेळी आंदोलकांनी “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “नीट परीक्षा रद्द करा”, “इन्कलाब जिंदाबाद” अशा घोषणांसह फलक झळकावले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढला. संसद भवन परिसरात पोहोचल्यानंतर आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, संसदेकडे जाणाऱ्या मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या तसेच लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेनंतर आंदोलन अधिकच तीव्र झाले असून त्याची धग आता देशातील विविध शहरांमध्ये पोहोचल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ‘कॉक्रोज जनता पार्टी’ने केंद्र सरकार चर्चेसाठी तयार झाल्याचा दावा केला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत सीजेपीच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.







