पुणे : सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांना प्रत्येक कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते ५ ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवावी लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना आपल्या समस्या आणि प्रलंबित कामांबाबत थेट संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करता येणार आहे. त्यामुळे एखाद्या कामासाठी वारंवार महसूल कार्यालयात जाण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही, अशी अपेक्षा आहे.

नागरिकांसाठी राखीव असलेल्या दुपारी ३ ते ५ या वेळेत अधिकाऱ्यांना अंतर्गत बैठक किंवा व्हीडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करता येणार नाही. या कालावधीत अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक महसूल कार्यालयाच्या दर्शनी भागात नागरिकांच्या भेटीची वेळ स्पष्टपणे नमूद करणारा सूचना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, संबंधित अधिकारी तातडीच्या कारणामुळे अनुपस्थित असल्यास नागरिकांच्या भेटीसाठी पर्यायी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे.
नागरिकांना आपल्या कामांसाठी मंत्रालय किंवा अन्य कार्यालयांच्या अनावश्यक फेऱ्या माराव्या लागू नयेत, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होण्यास या निर्णयामुळे मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







