Pune Traffic : पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी (Traffic) आणि अपघातांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘ट्रॅफिक्युअर’ नावाची नवीन सॉफ्टवेअर प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या मदतीने शहरातील वाहतुकीची स्थिती पोलिसांना रिअल टाइममध्ये समजणार असून, कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

या सॉफ्टवेअरला गुगल मॅप्सची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील कोणत्या रस्त्यावर वाहतूक संथ आहे, कुठे जास्त कोंडी आहे किंवा कुठे अपघात होण्याची शक्यता आहे, याची अचूक माहिती पोलिसांना मिळणार आहे. यामुळे पोलिसांना योग्य ठिकाणी कर्मचारी तैनात करता येतील आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने निर्णय घेता येतील.
वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी संपूर्ण शहराची 550 लहान विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात या प्रणालीची 45 दिवस चाचणी घेण्यात आली. या काळात शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा सरासरी वेग सुमारे 26.8 किलोमीटर प्रति तास असल्याचे आढळून आले. या चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने आता ही प्रणाली पूर्णपणे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे पोलिसांच्या या उपक्रमामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग सुचवणेही सोपे होणार आहे. या प्रणालीमुळे वाहतूक नियंत्रणात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार असून, पुणेकरांना भविष्यात वाहतुकीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







