पुणे: पुणेकरांनी पुढील काही दिवस पाषाण (Pune Traffic Diversion) रस्त्यावरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. शहरात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमुळे (Pune Police Bharati) पाषाण येथील पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते पण महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. उमेदवारांची वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने 17 फेब्रुवारीपर्यंत दररोज पहाटे 4 ते सायंकाळी 6 या कालावधीत अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस भरतीसाठी राज्यभरातून हजारो तरुण दररोज मुख्यालयात येत आहेत. पहाटेपासूनच मैदान परिसरात मोठी रांग लागत असल्याने रस्त्यावर वाहनांची कोंडी होत होती. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, उमेदवारांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मार्ग मोकळा ठेवणे या कारणांमुळे वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे.
पाषाण रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील प्रवेशद्वार ते बाणेर रस्त्याकडील प्रवेशद्वार हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बाणेर, औंध, विद्यापीठ परिसरातून पाषाणकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा फेरा घ्यावा लागू शकतो. पर्यायी मार्ग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौक मार्गे वळसा घेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
या बदलांचा सर्वाधिक परिणाम सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत जाणवण्याची शक्यता आहे. कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्यांनी वेळेआधी घराबाहेर पडणे, जीपीएसवरील लाईव्ह ट्रॅफिक अपडेट तपासणे आणि शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे अधिक सोयीचे ठरेल.
पोलीस भरती प्रक्रिया संपेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असल्याने नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







