जिंती, ता. 13 : जिंती (ता. करमाळा) येथील ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्त्व असलेल्या शालिनी उर्फ बेबीताई उमाजीराव राजेभोसले (वय 81) यांचे गुरुवारी (ता.12) रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. अत्यंत हुशार, सुशिक्षित आणि प्रेमळ स्वभावाच्या या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने जिंती परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, भावजय व भाचे असा परिवार आहे.

शालिनी राजेभोसले यांच्या पार्थिवावर जिंती येथील मकाई बागेत शोकाकुल वातावरणात शुक्रवारी (ता.13) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शासकीय व वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांत, संयमी आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या बेबीताईंच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
बेबीताई राजेभोसले यांनी आयुष्यभर कुटुंबासोबतच समाजातील अनेकांना आधार दिला. त्यांच्या निधनाने जिंतीतील एक आदरयुक्त, प्रेमळ अध्याय संपुष्टात आला असून नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम खात्याचे माजी सभापती कै. बॉबीराजे भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराजे राजेभोसले व शिवाजी राजेभोसले यांच्या त्या मोठ्या भगिनी होत.







