पुणे: संतोष देशमुख हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Murder Case) आता नवे वळण मिळाले आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या या हत्येनंतर राज्यभरात (Walmik Karad) मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात वाल्मीक कराड याला मुख्य आरोपी मानण्यात आले असून (Beed News) तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असतानाच सरकारने ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ तयार करणाऱ्या उच्चस्तरीय समितीमध्ये बदल केला आहे.

न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी समितीने सादर केलेल्या अहवालाच्या छाननीसाठी गृह खात्याच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नव्या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीत प्रधान सचिव (विशेष) आणि अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांसारखे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. ताहलियानी समितीच्या अहवालात काही गंभीर निरीक्षणे आणि प्रशासनिक त्रुटींचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. त्या निष्कर्षांचे बारकाईने परीक्षण करून पुढील कारवाईची दिशा ठरवणे, हे या समितीसमोरचे प्रमुख काम आहे.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, या समितीचा अहवाल लवकरच विधिमंडळात सादर केला जाऊ शकतो. दोषींवर कठोर कारवाई, तपास प्रक्रियेतील त्रुटी दुरुस्त करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवणे, या बाबी अहवालात अपेक्षित आहेत. त्यामुळे या बदलामुळे तपासाला वेग येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. लवकर आणि निष्पक्ष न्याय मिळावा, ही त्यांची मागणी आहे. समितीतील बदल हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, तपास अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. आगामी अधिवेशनात या अहवालावर चर्चा रंगण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.







