पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरमध्ये अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा वापर होत असल्याचे आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गार्डन वडापावसह चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील सहा आस्थापनांमधून ९ हजार ६७५ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या तेलाची किंमत २१ लाख ९४ हजार रुपये असल्याची माहिती एफडीएने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

अन्न व औषध प्रशासनाने १० आणि ११ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. खाद्यतेलाच्या साठ्यांची तपासणी करताना संशयित निकृष्ट दर्जाचे तेल आढळल्याने ते जप्त करण्यात आले. याशिवाय हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या नियमांचीही तपासणी करण्यात आली.

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील मे. बंसल ट्रेडिंग कंपनीकडून ६ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा १ हजार ६१ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच मे. रमेश लाल अँड सन्स या आस्थापनाकडून ६ लाख ६७ हजार २१९ रुपये किमतीचा २ हजार १०९ किलो तेलसाठा जप्त करण्यात आला.

पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरमध्ये अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा वापर आढळल्याने व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील बालाजी साउथ इंडियन फूड, रहाटणी येथील इंजिनिअर वडेवाले अँड थाळी आणि जी. के. हॉटेल युअर हेज या आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने या चारही आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, एफडीएच्या पथकाने पुणे विभागातील सात हॉटेल आणि ढाब्यांची तपासणी केली. यामध्ये लोहगाव येथील पंजाबी ढाबा, कोंढवा येथील खान-ए-खास हॉटेल आणि उरुळी देवाची येथील हॉटेल सोनाई येथे स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळले. खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.
खाद्यपदार्थांची गुणवत्ता, अस्वच्छता किंवा अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन याबाबत नागरिकांना तक्रार करायची असल्यास अन्न व औषध प्रशासनाने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासाठी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येणार आहे.






