पुणे: पुणे–मुंबई रेल्वे मार्गावरील प्रवास पुन्हा एकदा (Pune Railway) गर्दीच्या विळख्यात सापडला आहे. विशेषत: सिंहगड एक्सप्रेस मध्ये दररोज प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना अक्षरशः उभे राहण्यासही जागा मिळत नाही. जागा न मिळाल्यामुळे नियमित तिकीटधारक प्रवासी मासिक पासधारकांसाठी राखीव डब्यांमध्ये चढत आहेत. परिणामी पासधारक आणि इतर प्रवाशांमध्ये वादावादी वाढत असून महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

ही समस्या लक्षात घेऊन पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासी संघटना यांनी मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र राखीव डबा देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, प्रगती एक्सप्रेस आणि सिंहगड एक्सप्रेसमध्ये नियमित तिकीट तपासणी व्हावी यासाठी सह्यांची मोहीमही राबवण्यात आली आहे.
संघटनेच्या मते, पुणे–मुंबई मार्गावरील या गाड्या हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी जीवनवाहिनी आहेत. मात्र कोरोना काळानंतर डब्यांची संख्या कमी करण्यात आली. उदाहरणार्थ, सिंहगड एक्सप्रेसमध्ये पूर्वी 19 डबे होते, ते सध्या 14 वर आले आहेत. अनारक्षित प्रवाशांसाठी केवळ एकच जनरल डबा उपलब्ध असल्याने प्रवास अत्यंत गैरसोयीचा ठरत आहे.
महिलांची सुरक्षितता आणि सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र महिला डबा तसेच किमान तीन जनरल डबे पुन्हा जोडावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.







