Crime News: गोंदिया: महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 33 वर्षीय महिलेची तिच्या प्रियकराने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबानेही हत्येचा पुरावा लपवण्यासाठी त्याला मदत केली. ही घटना भोपाळच्या निशादपुरा भागात घडली, जिथे एका रिकाम्या घराच्या सेप्टिक टॅंकमध्ये लोखंडी पेटीत या महिलेचा मृतदेह सापडला. स्थानिक लोकांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी ही पेटी उघडली आणि त्यात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला.

तपासातून समोर आले की, मृत महिला आणि मुख्य आरोपी समीर यांची ओळख एका वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर ती गोंदिया सोडून भोपाळला समीरसोबत राहण्यासाठी आली होती. मात्र समीर आधीच विवाहित असल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत असत.
पीडित महिलेने समीरकडे लग्नासाठी किंवा 5 लाख रुपयांसाठी तगादा लावला होता, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली होती. या वादातून 9 जानेवारी रोजी समीरने तिचा गळा आवळून खून केला. घटनेनंतर समीरने आई, भाऊ आणि बहीण यांना बोलावून मृतदेह लोखंडी पेटीत ठेवून सेप्टिक टॅंकमध्ये टाकला.
शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने संशय आला आणि या घटनेची माहिती त्यांनी थेट पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली आणि त्यांना धक्कादायक माहिती हाती लागली. घरात असलेल्या एका सेप्टीक टॅंकमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी कुटुंबायांची याबाबत चौकशी केली त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
मृतदेहाच्या हातावरील दिपक नावाचा टॅटू आणि 26 मे 1992 ही जन्मतारीख यावरून ओळख पटली. पोलिसांनी समीरच्या आई, भाऊ आणि बहिणीला अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे. पुढील तपास सुरू आहे.







