Pune Metro : पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन MahaMetro ने मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला गती दिली आहे. या टप्प्यात मार्गिका 4-B (हडपसर–लोणी काळभोर) आणि 4-C (हडपसर–सासवड) यांचा समावेश असून पूर्व व दक्षिण उपनगरांना थेट जोडणी देण्यावर भर आहे. दोन्ही मार्गिकांसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून निविदांची अंतिम मुदत ५ मार्च २०२६ आहे.

मेट्रो 4-B : हडपसर–लोणी काळभोर
सुमारे 11.10 किमी लांबीची ही पूर्णतः उन्नत (Elevated) मार्गिका असेल. एकूण 10 स्थानके प्रस्तावित आहेत हडपसर फाटा, हडपसर बस डेपो, आकाशवाणी-हडपसर, लक्ष्मी कॉलनी, मांजरी फाटा, द्राक्ष बाग, टोल नाका, वाक वस्ती आणि लोणी काळभोर आदी. या मार्गावर डबल डेकर उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. खाली वाहनांसाठी रस्ता आणि वर मेट्रो मार्गिका. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गवरील दैनंदिन कोंडी कमी होण्यास मदत होईल.
मेट्रो 4-C : हडपसर–सासवड
सुमारे 5.57 किमी लांबीच्या या मार्गिकेवर 4 स्थानके प्रस्तावित आहेत. हडपसर ग्लायडिंग क्लब, फुरसुंगी IT पार्क, सुलभ उद्यान आणि सासवड रस्ता रेल्वे स्थानक. औद्योगिक आणि आयटी पट्ट्यातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.
या दोन्ही मार्गिका Khadakwasla – Kharadi Corridorचा भाग आहेत. हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतुकीची गरज तीव्र झाली आहे. नव्या मार्गिकांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागावरचा ताण कमी होऊन उपनगरांतील प्रवासाचा वेळ लक्षणीय घटेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार आहे. विस्ताराच्या या टप्प्यामुळे पुण्यातील मेट्रो जाळे अधिक व्यापक होऊन कोंडीमुक्त, वेळेवर आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय बळकट होणार आहे.







