पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Politics) पार्श्वभूमीवर शहरात वेगवान राजकीय घडामोडी (Pune Election) पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांत भाजपमध्ये (Ajit Pawar) इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपलाच गळती लागल्याचं चित्र दिसत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 27 मधून तिकीट न मिळाल्याने माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
धनंजय जाधव हे भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या पर्वती–नवी पेठ भागातील प्रभागात इच्छुक होते. मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धनंजय जाधव थेट अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी दाखल झाले. या घडामोडीमुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय जाधव यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे धनंजय जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असताना, दुसरीकडे प्रभाग क्रमांक 12 शिवाजीनगर–मॉडेल कॉलोनीमधून मुकारी आलगुडे यांनीही भाजपला रामराम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुकारी आलगुडे यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेत उपमहापौर म्हणून काम पाहिलं असून, शहराच्या राजकारणात त्यांचा अनुभव महत्त्वाचा मानला जातो.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नुकतीच अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कोण जाहीर करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरुवातीला युतीबाबत झालेल्या गोंधळामुळे माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सध्या विशेष खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.







