पुणे: पुणे शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शहर पोलीस दलात महत्त्वाचे प्रशासकीय बदल झाले आहेत.

यापूर्वी विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता विविध पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदल्यांनुसार, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक शाखेत कार्यरत असलेले रुणाल सुजाउद्दीन मुल्ला यांची डेक्कन पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील निरीक्षक अरुण घोडके यांची कोथरूड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांची कोंढवा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पंडित रेजितवाड यांची वानवडी पोलीस ठाण्यात, तर युवराज हांडे यांची लष्कर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांची काळेपडळ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
याशिवाय, खडक विभागातील गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय करनूर यांची नर्हे पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदीप पवार यांची लष्कर विभागातील गुन्हे शाखेतून लोणी काळभोर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे हाताळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






