अमित मुंडीक

पुणे: पुण्याचे माजी नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे यांच्या विरोधात (Pune News) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय 72) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
25 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, आपण अनुसूचित जातीचे आहोत हे माहिती असूनही मोरे यांनी जाणीवपूर्वक आणि हेतूपूर्वक अपमानास्पद शब्द वापरले.
वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत, “लहाडे इतकी दारू प्यायला होता की त्याला बोलताही येत नव्हते, तो ओढ्यात उतरून गटारे साफ करत आहे,” असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने आपली बदनामी झाली असून, मोठा मानसिक ताण आल्याचे लहाडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सध्या कुटुंब भीतीखाली असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
या तक्रारीची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







