Crime : बारामती तालुक्यातील भिगवण रोड परिसरात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत 5 मार्चच्या सायंकाळी लॉजवर छापा टाकला. कारवाईदरम्यान काही संशयास्पद हालचाली आढळून आल्याने तपास करण्यात आला आणि तेथे देहव्यापार सुरू असल्याचे उघड झाले.
या कारवाईत पोलिसांनी आसाममधील 3 महिला (वय 30, 21 आणि 26) तसेच पश्चिम बंगालमधील 1 महिला (वय 22) अशा एकूण 4 महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात या महिलांना काम किंवा चांगल्या उत्पन्नाचे आमिष दाखवून बारामतीत आणण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी सोमनाथ खोमणे, धिरज जाधव, सागर सोडबुके, मेराजुल अली, अफजल हुसेन आणि सदाम हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांकडून देहव्यापार करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका करत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 143 तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही काळात महामार्गांलगत असलेल्या लॉज व निवासस्थानांचा वापर अशा बेकायदेशीर कृत्यांसाठी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून अशा ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. बारामतीतील या कारवाईमुळे परिसरातील लॉजिंग व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात पोलिसांकडून पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.







