पुणे: नाशिकमधील भोंदू अशोक खरातने केलेल्या कृत्यामुळे महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad News) शहरातून बाल लैंगिक अत्याचाराची एक संतापजनक घटना समोर आली आहे. मोशी (Pune Crime) परिसरातील विनायकनगर येथे एका ४० वर्षीय नराधमाने सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या प्रकरणी तातडीने पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामु कुंजल निसाद असून तो ४० वर्षांचा आहे. ही घटना २ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. आरोपीने पीडित मुलीला आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने चिमुरडीला दिली होती. मात्र, या नराधमाची विकृती एवढ्यावरच थांबली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ एप्रिल रोजी सकाळी त्याने पुन्हा त्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी नशिबाने पीडित मुलीची आई आणि आत्या तिथे पोहचल्या. त्यांनी खिडकीतून आरोपीचे घृणास्पद कृत्य प्रत्यक्ष पाहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडलेला हा प्रकार पाहून आईला मोठा धक्का बसला. तिने वेळ न घालवता एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गाठले आणि नराधम रामु निसाद विरुद्ध तक्रार नोंदवली.
आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आणि लहान मुलांवरील लैंगिक छळ यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. बदलापूरमधील घटनेच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






