पुणे: पुणे (Pune News) एका महिलेने एका पुरुषावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार केल्यानंतर महिलेने त्या व्यक्तीला पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरी प्रल्हाद वांजळे असे आरोपी महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने पीडित पुरुषाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केला. अत्याचार करत असतानाचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिने स्वतः शुट केले. रेकॉर्ड केलेले अश्लील व्हिडीओ दाखवून महिला ब्लॅकमेल करून त्या व्यक्तीकडे वारंवार पैशांची मागणी करत होती.
कोथरूड परिसरात राहणाऱ्या गौरी प्रल्हाद वांजळे हिच्या कृत्यांमुळे अनेक नागरिक आणि कुटुंबे अडचणीत आल्याचे समोर आले आहे. ही महिला अनेक वर्षांपासून लोकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असल्याचा, लग्नाचे आमिष दाखवत खोटे बोलत असल्याचा आणि नंतर धमकावून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप पीडित व्यक्तींनी केला आहे.
“बलात्काराच्या केस मध्ये अडकवेल ही धमकी देऊन वारंवार पैसे उकळणे आणि कोथरूड पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे” अशा सगळीकडे बतावण्या करून ती पिडीत तरुणांना ब्लॅकमेल करत होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, सदर महिलेने सहा पेक्षा जास्त लग्न केलेली आहेत आणि लग्न करण्याचे वचन देऊन ती पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल करून बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या धमक्या देते.
हायकोर्टातून काढण्यात आलेल्या बार कौन्सिलच्या माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार सदर महिला ही वकील नाही. दरम्यान, पीडित व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी संबंधित महिलेने ‘मी वकील आहे’ असा धाक दाखवला होता. तक्रारीनुसार, महिलेने पीडित पुरुषाच्या कोल्हापूर येथील घरात आणि पुण्यातील महिलेच्या राहत्या घरात, तसेच महिलेने बळजबरीने काशी विश्वनाथ या धार्मिक स्थळाच्या परिसरातही बळजबरी घेऊन जाऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुरुषावर बलात्कार झाल्याची ही अत्यंत गंभीर घटना समोर आल्याने नागरिकांत जोरदार चर्चा सुरू आहे. कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







