Pune News: पुणे : पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल परिसरात पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या मांजामुळे (Nylon Manja) नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांत या मांजामुळे चार महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नवनिर्मित बोपखेल पुलावर ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, एका महिलेच्या गळ्याला खोल जखम झाल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. प्रशासन सध्या निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे अवैध मांजा विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

बोपखेल पुलावरून दुचाकीवरून प्रवास करत असताना वाऱ्यामुळे उडून आलेला मांजा अचानक अंगाला अडकत असल्याच्या घटना घडत आहेत. या मांजामुळे चार महिलांच्या हाताला आणि गळ्याला जखमा झाल्या आहेत. यातील अर्चना पवार या महिलेच्या गळ्याला गंभीर काप लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या 72 तासांत घडलेल्या या घटनांमुळे दुचाकीस्वारांमध्ये भीती पसरली आहे.
खडकी, दापोडी आणि आसपासच्या भागात नायलॉन आणि चिनी मांजाची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या मांजावर बंदी असतानाही तो बाजारात सहज मिळतो, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांकडून केवळ घटनांची नोंद घेतली जाते, मात्र मूळ विक्रेत्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने धोका कायम आहे. पुलावर अडकलेले तुटलेले पतंग आणि लोंबकळणारे मांजे दुचाकीस्वारांसाठी फास ठरत आहेत.
या प्रकारामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध मांजा विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम राबवावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बोपखेल परिसरातील नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.






