Ayushman Bharat Arogya Yojana : महाराष्ट्र : गंभीर आजारपणाच्या काळात उपचारासाठी पैशांची चिंता कमी व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार खासगी रुग्णालयांमध्ये मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड ( Ayushman Card) काढताना अनेक अडचणी येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

हेही वाचा– पुण्यात नायलॉन मांजाचा उच्छाद; एकापाठोपाठ 4 महिलांचे गळे कापले, नागरिकांचा संताप
सध्या आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया आयुष्मान महा ई-सेवा केंद्रांमार्फत राबवली जाते. मात्र या केंद्रांवर कार्ड काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पहिल्याच टप्प्यावर अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी रेशनकार्ड आहे का, हा पहिला प्रश्न विचारला जात असून रेशनकार्डधारकांनाच कार्ड मिळेल, अशी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे रेशनकार्ड नसलेले किंवा रेशनिंग प्रक्रियेत अडचणीत असलेले अनेकजण थेट योजनेपासून वंचित राहत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे काही नागरिकांकडे वैध रेशनकार्ड असूनही त्यांचे आयुष्मान कार्ड तयार होत नाही. ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन असणे, नावातील स्पेलिंगचा फरक, आधार क्रमांक किंवा इतर कागदपत्रांमधील तफावत यामुळे अर्ज वारंवार फेटाळले जात आहेत. परिणामी प्रत्यक्षात पात्र असतानाही अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांसाठी खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत आयुष्मान योजनेचा आधार महत्त्वाचा ठरतो. मात्र आजारपणाच्या वेळी कार्डच उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेबाबत नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार आयुष्मान कार्ड काढण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. रेशनिंग नसेल तर कार्ड मिळणार नाही, असे सरळ सांगितले जात असल्याने अनेकजण निराश होऊन परत जात आहेत. सर्व पात्र नागरिकांना अडथळ्याविना आयुष्मान कार्ड मिळावे यासाठी प्रशासनाने तातडीने स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी साताऱ्यातील नागरिकांकडून होत आहे.






