प्रतिनिधी अमित मुंडीक

Pune News: पुणे: युनिट-4 व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2, गुन्हे शाखा, पुणे शहर (Pune News) यांनी जबरी चोरी करणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला 1 लाख रुपये किंमतीच्या गॅलेक्सी झेड फोल्ड मोबाईलसह ताब्यात घेतले. येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा र.नं. 105/2026 भा.न्या.सं. कलम 304 (2) अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असताना मुळा रोड परिसरात कमी किमतीत चोरीचा मोबाईल विक्रीसाठी प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले असता तो विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने साथीदारासह तीन दिवसांपूर्वी हॉटेल कल्याणी जवळ रात्री 11 वाजता पायी जाणाऱ्या व्यक्तीकडील मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. तसेच शिवाजीनगर पीएमटी बसस्टॉप परिसरात आणखी एका व्यक्तीकडील मोबाईल जबरीने चोरल्याचेही समोर आले.
येरवडा व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हे दाखल असून बालकाकडून जप्त मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी विधीसंघर्षित बालक व मुद्देमाल येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.







