पुणे: केस गळती म्हटलं की, आपण लगेच (Hard Water) शॅम्पू किंवा तेल बदलतो. पण कधी विचार केलाय का की, ज्या पाण्याने तुम्ही केस धुता, तेच पाणी तुमच्या केसांचा शत्रू असू शकतं? शहरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये सध्या ‘खारे पाणी’ ही एक गंभीर समस्या बनली असून, त्यामुळे तरुण पिढीमध्ये केस गळण्याची समस्या वाढली आहे.

जेव्हा पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांचे प्रमाण जास्त असते, तेव्हा त्याला ‘जड पाणी’ किंवा ‘खारे पाणी’ म्हणतात.
-
खनिजांचा थर: हे पाणी केसांच्या मुळाशी खनिजांचा एक पातळ थर तयार करते. यामुळे ओलावा केसांच्या आत जाऊ शकत नाही.
-
कोरडेपणा: खारे पाणी केसांमधील नैसर्गिक तेल शोषून घेते, ज्यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होऊन तुटायला लागतात.
-
कोंडा आणि खाज: टाळूवरक्षारांचा थर साचल्याने खाज येते आणि कोंड्याची समस्या वाढते.
तुमचे पाणी ‘खारे’ आहे हे कसे ओळखावे?
१. केस धुतल्यानंतर ते खूप चिकट वाटणे. २. शॅम्पूचा फेस कमी होणे. ३. बादली किंवा नळावर पांढऱ्या रंगाचे डाग.
घरगुती आणि प्रभावी उपाय
जर तुम्हाला पाणी बदलणे शक्य नसेल, तर खालील उपाय नक्की करून पहा:
-
लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर: एक बादली पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस किंवा एक चमचा ‘ॲपल सायडर व्हिनेगर’ टाका. केस धुतल्यानंतर शेवटचा मग या पाण्याने डोकं धुवा. यामुळे केसांवरील क्षारांचा थर निघून जातो.
-
वॉटर सॉफ्टनर : बाजारात नळाला बसवता येणारे छोटे ‘शॉवर फिल्टर्स’ मिळतात. ते पाण्याचे क्षार कमी करतात.
-
गाळलेले किंवा उकळलेले पाणी: शक्य असल्यास केस धुण्यासाठी पिण्याचे पाणी किंवा उकळून गार केलेले पाणी वापरा.
-
डीप कंडिशनिंग: आठवड्यातून एकदा नारळाचे तेल किंवा कोरफडीचा गर लावून केसांना पोषण द्या, जेणेकरून पाण्याचा दुष्परिणाम कमी होईल.
केसगळती केवळ पाण्यामुळेच नाही, तर आहार आणि तणावामुळेही असू शकते. जर पाण्याचे उपाय करूनही केस गळती थांबत नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.







