Crime News: कराड : कराड तालुक्यातील आगाशिवनगर परिसरात मंगळवारी पहाटे एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना घडली आहे. एका महिलेनं आपल्या प्रियकराची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या (Murder) केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर त्या महिलेने स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र मरीआप्पा काळे (वय 45, रा. शिवाजी स्टेडियम मागे, कराड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर सारिका चंद्रकांत कोळी (रा. इगवले वस्ती, आगाशिवनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. दोघांमध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र अलीकडे त्यांच्या नात्यात वाद वाढले होते. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हा सारिकाच्या घरी आला होता. यावेळी त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. वाद वाढत गेल्याने हाणामारी झाली. संतापाच्या भरात सारिकाने घरात असलेल्या कुऱ्हाडीने राजेंद्रवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कराड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी महिला सारिका कोळी हिला ताब्यात घेऊन तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राथमिक तपासात राजेंद्रकडून सतत चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याने सारिकामध्ये चिडचिड वाढली होती, अशी माहिती मिळाली आहे. याच कारणातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे आगाशिवनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






