पुणे: पुणे (Pune News) शहरात एका ३२ वर्षीय महिलेवर दोन महिलांनी मिळून भयानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शिवणे परिसरातील एनडीए रोडवर ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजता हा प्रकार घडला. अनैतिक संबंधांच्या संशयावरून हा हल्ला करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेतील आरोपी महिलेला तिचा पती आणि पीडित महिला यांच्यात संबंध असल्याचा संशय होता. याच रागातून आरोपी महिला आणि तिच्या एका मैत्रिणीने पीडितेची वाट अडवली. त्यांनी सुरुवातीला तिला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर दगडाने तिच्या चेहऱ्यावर वार केले. हा राग इतक्यावरच थांबला नाही, तर आरोपींनी पीडितेच्या तोंडावर बाटलीत आणलेले ॲसिडसारखे जळजळणारे रसायन ओतले.
या जीवघेण्या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आता पीडितेच्या अंगावर फेकलेले रसायन नक्की कोणते होते, हे शोधण्यासाठी मेडिकल रिपोर्ट आणि फॉरेन्सिक पुराव्यांची वाट पाहत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे शिवणे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.







