पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात नवीन वर्ष 2026 चे स्वागत होत असतानाच वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये अनेक लोक दारू पिऊन गाड्या चालवत असल्याचे दिसून आले. अशा चालकांमुळे रस्त्यावरील इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी कडक नाकाबंदी केली होती. या विशेष तपासणीमध्ये एकूण 240 चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पकडले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेच्या 13 विभागांनी मिळून शहरातील 47 मोक्याच्या ठिकाणी ही तपासणी मोहीम राबवली. यामध्ये 220 दुचाकीस्वार आणि 20 चारचाकी गाड्यांच्या चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सर्व चालकांविरोधात आता गुन्हा दाखल केला जाणार आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि सह आयुक्त डॉ. राशीकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले की, रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची होती. पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई न थांबता अशा चालकांवर कडक कायदेशीर पावले उचलली आहेत.







