Pune Leopard : पुणे शहर आणि परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरमुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः ग्रामीण भागात आढळणारा बिबट्या आता थेट शहराच्या मध्यवर्ती भागातील सोसायट्यांमध्ये आणि पुणे विमानतळाच्या (Pune Airport) रनवेवर स्पॉट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने शहरात हाय अलर्ट जारी केला असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. Pune Leopard

पुणे शहरातील औंध आणि सिंध सोसायटीसारख्या अत्यंत मध्यवर्ती भागात बिबट्या आढळल्यामुळे वन विभागाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. १९ नोव्हेंबर रोजी पुणे विमानतळ प्रशासनाने रनवेवर बिबट्या दिसल्याची तक्रार वन विभागाकडे नोंदवली होती. मे महिन्यात याच परिसरात जो बिबट्या आढळून आला होता, तोच पुन्हा दिसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानतळ प्रशासनाने माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ परिसरात जाऊन पाहणी केली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
वन विभागाने बिबट्याचा वावर असलेल्या एअरपोर्ट परिसरात धोका असल्याची कबुली दिली आहे. त्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, पूर्वी लावलेला पिंजरा त्याच परिसरात थोड्या वेगळ्या ठिकाणी लावण्यात आला आहे. शहरात दोन ठिकाणी बिबट्याच्या हालचाली आढळून आल्यानंतर पुणे वन विभाग आणि रेस्क्यू टीम सतत घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहीम राबवत आहे. थर्मल ड्रोनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात आहे.
या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या शिरूर भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शिरूर परिसरात दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिक धास्तावले आहेत. अशातच शहरातही आता बिबट्याने शिरकाव केल्याने त्याला लवकरात लवकर पकडून जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक आणि विविध संस्थांकडून जोर धरू लागली आहे.







