पुणे: बृहन्मुंबई महापालिकेनंतर (Pune Election) राज्याचे लक्ष पुणे महापालिका निवडणुकीकडे लागले होते. सत्ताधारी भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील (Pune Voting) राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुण्यात अक्षरशः काँटे की टक्कर पाहायला मिळाली. प्रचार संपल्यानंतरही दोन्ही (Pune Mahapalika Election) बाजूंमधील संघर्ष शमला नाही. उलट मतदानाच्या दिवशीच राजकीय तापमान शिगेला पोहोचले आणि पुण्यात एका दिवसात दोन दंगलीचे गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. (Latest Marathi News)

प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय संघर्षाला हिंसक वळण लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या सुनेवर रात्री हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी दुपारी भाजपचे नेते प्रमोद निम्हण यांच्या समर्थकांनी चांदेरे यांच्यावर बोगस मतदार आणल्याचा आरोप करत त्यांची गाडी फोडली. या घटनेनंतर पुन्हा एकदा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रभाग क्रमांक 33 मधील धायरी गावातही वातावरण तणावपूर्ण झाले होते. कथित पैसे वाटपावरून दोन गट आमनेसामने आले. किशोर पोकळे आणि राहुल पाकळे यांच्यात जोरदार मारहाण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
प्रभाग क्रमांक 25 ड मध्ये मतदान यंत्रांबाबत तक्रारींचा पाऊस पडला. राष्ट्रवादीचे बटण दाबल्यानंतर मतदान होत नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला. तर शिवाजी मराठा हायस्कूलमधील मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे बटण दाबल्यावर भाजपला मत जात असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, दुपारी 3.30 वाजेपर्यंत पुण्यात सुमारे 40 टक्के मतदान झाले होते. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावलेला असला, तरी दुपारनंतर मतदानात लक्षणीय वाढ झाली. तरुण-तरुणींसह महिलांनीही मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी गर्दी केली.
राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक असल्याने पुण्यातील प्रत्येक प्रभागात सत्तेचा संघर्ष दिसून आला. निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुण्याची सत्ता कुणाच्या हाती जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.







