Politics : महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून देशभरात आहे. अनेकदा या राज्याने देशाला दिशा दिली आहे. मात्र याच महाराष्ट्रात मतदारांना त्यांच्या मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याचे गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. कल्याणमध्ये तर मतदार येण्याआधीच त्यांच्या नावावर दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याच्या घटना उघडकीस आल्या असून, त्यामुळे लोकशाही प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (politics)

राज्यभरात आज २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. दुबार मतदार, अमिट शाई सहज पुसली जात असल्याचे आरोप आणि आता थेट बोगस मतदानाच्या घटना समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. (politics)
निवडणूक आयोगाने दुबार मतदारांबाबत स्पष्टीकरण देत अशा प्रकरणांत हमीपत्र घेतले जात असल्याचे सांगितले आहे. तसेच बोटावरील शाईबाबत निर्माण झालेला वाद हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कल्याण पूर्वेतील घटना आयोगाच्या या स्पष्टीकरणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ठरत आहेत. (politics)
गायत्री शाळा मतदान केंद्रातील प्रकार
कल्याण पूर्वेतील गायत्री शाळेतील मतदान केंद्रावर सुमन भालचंद्र गायकवाड या मतदार महिलेला मतदान करता आले नाही. सुमन गायकवाड या पती व मुलासह मतदानासाठी आल्या असता, त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे गायकवाड कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सेंट लुड्स शाळेतही बोगस मतदान
कल्याण पूर्वेतील सेंट लुड्स शाळेतील मतदान केंद्रावरही असाच प्रकार समोर आला आहे. रमेश पवार या मतदाराच्या नावावर अज्ञात व्यक्तीने आधीच मतदान केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीने ओळखपत्र दाखवून मतदान केल्याची माहिती देण्यात आली.
सोशल मीडियावर संताप
कल्याण पूर्वेतील मतदार सुरेश पाटील यांनी फेसबुकवर आपला अनुभव मांडत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तक्रार केल्यानंतर मतदान अधिकारी आणि झोन अधिकाऱ्यांनी, “अशा घटना होतात, आम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला जिथे तक्रार करायची तिथे करा,” असे उत्तर दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“लोकशाहीतून ठोकशाहीकडे प्रस्थान सुरू आहे. सगळं मॅनेज असल्याचे त्यांच्या हावभावावरून लक्षात आले,” असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
लोकशाहीसाठी गंभीर इशारा
मतदान हा लोकशाहीचा कणा मानला जातो. मात्र मतदार येण्याआधीच त्यांच्या नावावर मतदान होत असल्याचे प्रकार समोर येत असतील आणि त्यावर ठोस कारवाई होत नसेल, तर ही लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. कल्याणमधील या घटनांची निवडणूक आयोग कितपत गंभीर दखल घेतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







