Pune Crime : पुणे : चाकण परिसरात घरगुती वादातून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावानेच आपल्या धाकट्या भावावर चाकूने हल्ला (Attack) केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काम न करणे आणि दारू पिण्याच्या सवयीवरून दोघा भावांमध्ये वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास चाकण येथील शनिमंदिराच्या पाठीमागे ही घटना घडली. दयानंद माणिक सावंत (वय 25) हे घरात असताना त्यांचा मोठा भाऊ किशोर माणिक सावंत (वय 30) स्वयंपाकासाठी पोहे बनवण्याच्या तयारीत कांदा चिरत होता. त्याच वेळी दोघांमध्ये दारू पिणे आणि काम न करणे या कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला दोघांमध्ये बोलाचाली झाली, मात्र काही वेळातच हा वाद अधिक वाढला.
रागाच्या भरात किशोर सावंत याने हातात असलेला कांदा कापण्याचा चाकू दयानंद सावंत यांच्या डाव्या बरगडीजवळ खुपसल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात दयानंद गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी जखमी दयानंद सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी किशोर सावंत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी बीएनएसएस कलम 35(3) नुसार आरोपीला नोटीस बजावून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करत आहेत.
घरगुती वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. भावामध्येच झालेल्या या हिंसक प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निघोट करत आहेत.







