Pune Crime: पुणे: पुण्यात नेमकं चाललं तरी काय? एका अल्पवयीन मुलावर हल्ला (Attack) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील महर्षीनगर परिसरात पीएमपी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलावर हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून एका 14 वर्षीय मुलावर धारदार शस्राने हल्ला झाला. या प्रकरणी पीडित मुलाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हल्ल्यात पीडित मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली असून हल्ल्यानंतर आरोपी आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.
तक्रारदार पीडित मुलगा कोंढव्यातील बधेनगरमध्ये राहतो. तो 01 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 4.45 वाजता घरी जाण्यासाठी निघाला होता. महर्षीनगरमधील पुजारी उद्यानाजवळील पीएमपी बसथांब्यावर तो थांबलेला असताना एक संशयित युवक तेथे आला. त्याने मुलाकडे रागाने पाहत अचानक हातातील शस्त्राने त्याच्या हातावर वार केला. मुलाने मोठ्याने आरडाओरडा सुरू करताच आरोपी दोन साथीदारांसह पळून गेला.
घटनेची माहिती स्थानिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरु असून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला आहे.







